Friday, 5 August 2016

                          प्रश्न

            “माझं लग्न झाल्यावर ज्या दिवशी मी नातूंच्या घरी आले, त्याच दिवशी माझ्या नव-यानं, उदयनं मला सांगून टाकलं. ‘हे बघ आपण दोघेही वेगवेगळ्या घरात वाढलो. दोन्हीकडचे विचार वेगळे, वातावरण वेगळे, आचारही वेगळेच. त्यामुळे आपली व्यक्तिमत्वे वेगळी असणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच आपण आपल्या सहजीवनाला सुरुवात करण्यापूर्वी हे ठरवून टाकू या की, ज्या गोष्टीत आपलं एकमत होईल त्या गोष्टी आपण आधी करायच्या. जिथं एकमत होणार नाही तिथं जास्त वाद घालत न बसता एकाच्या विचारानं चालायचं. दुस-यानं त्यात खो घालायचा नाही. हे एकदा ठरलं की मतभेदाचे प्रसंग येणारच नाहीत.’ मला उदयचा हा मोकळेपणा फार आवडला. त्यामुळे लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस खूप छान गेले. माझ्या सुखाचा मलाच हेवा वाटू लागला.

     पण हळूहळू माझ्या हे लक्षात यायला लागलं की, कोणत्याही बाबतीत आमचं दोघांच एकमत क्वचितच होतं. मग जो काही निर्णय घ्यायचा असेल तो एकालाच घ्यावा लागायचा. बहुतेक वेळा हे काम उदयच करायचा. घरात लागणा-या छोट्या चमच्यापासून ते फ्रीझसारख्या मोठ्या वस्तूपर्यंत खूप गोष्टी वेळोवेळी घेणं गरजेचं होतं. मी त्याची यादी केली होती. पण त्या वस्तू केव्हा घ्यायच्या हे मात्र उदय ठरवायचा. साडीच्या दुकानात गेल्यावर एखादी साडी मला आवडली तरी ती घेणं वा न घेणं याचा निर्णय सर्वस्वी उदयचाच असे. मी आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर अवलंबून नव्हते तरी देखील ! दादा-वाहिनीच बाळ पहायला माझ्या माहेरी कधी जायचं हे देखील तोच ठरवायचा आणि त्याप्रमाणे मी ऑफिस मधून निघून त्याच्याबरोबर जायचं. असे एक ना दोन अनेक प्रसंग घडत गेले. नवीन संसार असल्यानं काही दिवस  मी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण मतभेदाच्या वेळी मी म्हणेन तसं कधीच घडत नसे. उदय मात्र आमच्या त्या अलिखित ठरावाचा भरपूर फायदा घेई. मग काही प्रसंगी मी माझा विरोध दाखवायला सुरुवात केली. माझ्या माहेरच्या बहुतेक    कार्यक्रमांना येण्याच तो टाळायचा. मला सुद्धा जायला विरोध करायचा. मग त्यावरून आमची भांडणे व्हायची. पण घराचा विचार करून ब-याचदा मला माघार घ्यावी लागे. चर्चा करून एखाद्या मुद्द्यावर एकमत घडवायची त्याची तयारी नसायची. मग आम्ही अबोला धरत असू. पण शेवटी तो म्हणेल तेच करावे लागे. कित्येकदा मी त्याला न विचारता खूप गोष्टीत स्वत: निर्णय घेऊ लागले. त्यातून त्याचा अहंकार दुखावला. आपल्या घरात पुरुष दुय्यम भूमिका घ्यायला तयारच नसतात. पण मी जुन्या वळणाची खाली मान घालून जगणारी स्त्री नव्हते. त्यामुळे मतभेद सतत होत.  प्रीतमदादा लहान होते आणि सासूबाई कधीही आमच्यात मध्यस्थी करीत नसत. तो त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे आमच्या दोघातले मतभेद वाढत गेले.

             एक दिवस आमच्या ऑफिस मधल्या लेडीज ग्रुपची सहल पावसाळा एंजॉय करायला माथेरानला जाणार होती. तिथं मुक्काम करण्याचा बेत होता. मी जाण्याचा मनोदय व्यक्त करताच, उदयन मला जायला विरोध केला. त्याच्या कंपनीत कसलंसं सेमिनार होतं म्हणून त्याला घरी यायला उशीर होणार होता. प्रीतमदादा मित्राच्या लग्नासाठी परगावी गेले होते. त्यामुळे दिवसभर सासूबाई एकट्या रहातील एवढाच त्याचा मुद्दा होता. एरवी अनेकदा दादा सासुबाईना एकटं ठेवून मित्रांच्यात जातात.  त्या शिवाय देखील  सासूबाई घरी खूपदा एकट्या राहिलेल्या मी पाहिल्या आहेत. मग त्या दिवशीच विरोध का ! बरं मी संध्याकाळच सारं स्वयंपाकपाणी सकाळीच  उरकून जाणार होते. सासरे गेल्यापासून सासूबाई थोड्याशा एकलकोंड्या झाल्या होत्या. म्हणून काळजी होती इतकच. पण ती चिंता मला सुद्धा होती. त्यांची नीट व्यवस्था लावून मी नेहमीच जात असते. आणि एखाद्या दिवशी मुक्काम केला तर एवढं काय बिघडणार होतं! अशी ट्रिप काही नेहमी नसते. पण उद्यनं माझं काहीच ऐकून घेतलं नाही. शेवटी त्याचा विरोध असूनही मी ट्रीपला निघून गेले. तिकडे वेळ छान गेला. आम्ही सारे खूप रमलो,  मोकळेपणा अनुभवला, खूपशी उर्जा मनात साठवून घेतली आणि प्रसन्न मनानं घरी परत आलो. पण परत आल्यावर पहाते तो सासुबाईना प्यारालीसिसचा अटक आल्यानं हॉस्पिटलला नेलं होतं. मी त्याचा विरोध पत्करून गेल्याचा राग आधीच त्याच्या मनात होता. त्यात ही अडचण उदभवली. मग माझ्या वागण्याची हजेरी घेऊन उद्यनं मला बरंच काही ऐकवलं. मीही काही न बोलता ऐकून घेतलं. हॉस्पिटलच्या वा-या सुरु झाल्यानं उदयन चार दिवस रजा काढली होती. घर सांभाळून मला दवाखान्यात हेलपाटे घालावे लागणार होतं. तो रात्री झोपायला जाणार होता. चार दिवस व्यवस्थित गेले. औषधपाणी सुरु झालं. त्याची रजा संपल्यावर मी रजा घेतली. एक दिवसाआड मीही झोपायला जाऊ लागले. दिवसभर प्रीतमदादा बसायचे. पण ऑफिसमध्ये अर्जंट काम निघाल्यानं मला जावं लागलं. मग, ’कशाला महत्व द्यायचं हे तुला कळत नाही’ असं ऐकून घ्यावं लागलं. कसेबसे दहा दिवस पार पाडले. त्यानंतर सासुबाईंना घरी आणलं. ४-५ महिने तरी त्यांचं सारं जाग्यावरच करावं लागणार होतं. त्यांची डावी बाजू पूर्ण अधू झाली होती. मग मी पुन: चांगली महिनाभराची रजा घेऊन त्यांची सेवा केली. त्यानंतर मात्र माझी धावपळ सुरु झाली. इतके दिवस सासूबाई, मी ऑफिसला गेल्यावर मागचं सारं आवरायच्या. एरवीही मला जमेल तशी मदत करायच्या. पण आता त्यांचच आवरायला लागायचं. त्याशिवाय दोन वेळचा स्वयंपाक, इतर रोजची कामे आणि नोकरी हे मला जमेना. नोकरी सोडावी वाटू लागले. उदयला हे सांगून पाहिले पण त्याला ते पटले नाही.चार सहा महिने अडचण होईल त्यासाठी नोकरी का सोडायची असं तो म्हणायचा. मी स्वत: निर्णय घेऊन नोकरी सोडली असती तरी तो काही बोलला नसता. पण त्या परिस्थितीत त्याच्या मनाविरुद्ध वागण्याच धाडस मला झाले नाही.

   काही दिवसांनी सासूबाई पुन: ठीक झाल्या. हिंडू फिरू लागल्या. मग उद्यनं एकेक निर्णय घ्यायला सुरुवात केली. आम्हाला मूल व्हायचा निर्णय असो किंवा निकिताच्या जन्मानंतर तिला विशिष्ठ शाळेत घालायचा निर्णय असो, सारं त्यानच ठरवलं. मी तस केलं. दुस-या मुलाच्या जन्माला माझा विरोध होता पण उद्यनं त्याचाच हट्ट चालवला.निष्कर्षच्या जन्मानंतर मात्र दोन मुलांचा सांभाळ, सासूबाईची उठबस, घरातली धावपळ, नोकरी हे सारं मला त्रासदायक वाटू लागलं. प्रीतामदादाही होतेच. त्यांच्या नोकरीचं बस्तान नीट न बसल्यानं ते एकटेच होते. पुढे एक दिवस मी टोईफाइडनं आजारी पडले. माझ्याकडे कोण लक्ष देणार ! मुले लहान आणि नवरोजी बेफिकीर. माझ्या आईचं वय झालेलं. दादा-वाहिनी एक दोनदा येऊन भेटून गेले. पण घरात कोण करणार! मुलांच नीट होईना. उदय घरात असून नसल्यासारखाच. मी उठत बसत कसंतरी ओढून काम करे. मला मदत करणे तर दूरच, उलट त्याचंच  काही कमी जास्त झालं तर लगेच तो कुरकुर करायचा. माझी पण सारखी चिडचिड होऊ लागली. तोपर्यंत घरात खाणारी तोंडे आणि सा-याच जबाबदा-या वाढल्यानं नोकरी सोडून चालणार नव्हतं. येणा-या अडचणींवर दोघांनी बसून चर्चा करून मार्ग काढण्याची पद्धत नव्हती. मी जशी अनेकदा मनाविरुद्ध तडजोड केली तशी आपणही करायला हवी याची जाणीव उदयला नव्हती. दरम्यान सासुबाईंचं निधन झालं. पूर्वी आमच्यात थोडा तरी संवाद होता. पण त्यानंतर अलिप्तता वाढली.प्रीतमदादा नोकरीच्या ठिकाणी निघून गेले. मी घरकाम, मुले, त्यांचा अभ्यास, नोकरी यात बुडून गेले. तो कंपनी ,दौरे, प्रमोशन यांच्यात अडकला. मुलांच विश्व देखील हळूहळू वेगळं होऊ लागलं.

       एकांतात विचार करताना, पूर्वी संसाराच्या सुरुवातीच्या काळात आम्ही दोघांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता, वैवाहिक जीवनाला बाधक होता, हे माझ्या लक्षात आलं. त्या प्रमाणे मला वागण्याच स्वातंत्र्य जरी मिळालं नाही तरी उद्यनं त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता. ही चूक त्याला कळली असती तर कदाचित आम्ही पुन: जवळ आलो असतो. कदाचित मी काय म्हणते हे त्याला समजले असते. त्यानं माझा विचार केला असता. मी त्याला ही जाणीव देण्याचा प्रयत्न करून पाहिला पण ते मला जमेना. त्याचा परिणाम आमच्या दोघात संवाद असा काहीच  राहिला नाही. एकमेकांच्या सुखदु:खात दुस-याचा आधार राहिला नाही. मन मोकळे करायला कुणाकडे जाणार ! बाहेरचे लोक जवळचे वाटू लागले. संसार मांडलाय, मुले झालीत, घर आहे म्हणून एकत्र रहायचं एवढंच. हळू हळू मी  मुलांच्या मोठं होण्याच्या प्रक्रियेत आनंद शोधू लागले. पण त्यातही दोघांची दोन मते. मुले गोंधळून जायला लागली.घरकाम करणारं आणि पैसा मिळवणार एक मशीन एवढीच माझी किंमत राहिली. तशातच मला आणखी एक धक्का बसला. एक दिवस रस्ते अपघातात माझी आई व दादाची सारी फ्यामिली गेली.ते कोल्हापूरला गाडीनं देवदर्शनाला निघाले होते. बाबा आधीच गेले होते. माझा माहेरचा तुटपुंजा आधार देखील निखळला. मी पारच कोलमडले. मला जगण्यात रस वाटेनासा झाला. मुलांकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं. तरीही सावरण्याचा मी प्रयत्न करत होते.

           त्यानंतर केव्हातरी आमच्या दोघात खूप जोरात भांडण झालं. निमित्त साधेच. हल्ली मला बीपीचा त्रास सुरु झाला आहे. खूप डोके दुखते. काही वेळा चक्कर सुद्धा येते. पण उदयला त्याचं काहीच वाटत नाही. वयामुळे हा त्रास आहे हे त्याचं मत. मी त्याच्या या मताकडे फार लक्ष देत नाही. त्या दिवशी मुले सहलीला गेली होती. दुस-या दिवशी येणार होती. तब्ब्येत बरी नसल्यानं मीही घरी होते. आजकाल वेळेअभावी आणि प्रकृतीच्या तक्रारीमुळे  माझं सहल, नाटक, सिनेमा सारं बंद झालाय. वाचन सुद्धा जमत नाही. टीव्हीवर काहीबाही पहात मी वेळ घालवते. त्या दिवशी हे महाराज मला घरी ठेवून ऑफिस मधून परस्पर मित्रांबरोबर सिनेमाला गेले. मला फोन देखील केला नाही.  मी त्याची जेवायला रात्री  नऊ वाजल्यापासून वाट पहात होते. महाशय रात्री अकरा वाजता जेऊनच आले. आल्यावर काही न बोलता झोपायला निघाले. मी उपाशीच होते. मग मी चिडले. एकतर सकाळपासून माझं डोकं चढलं होत. अंग ठणकत होतं. मी ऑफिसला देखील गेले नाही. त्याची वाट पहात बसले आणि हा माणूस साधी चौकशी देखील करायला तयार नाही. खूप काही बोलले. तुझ्यामुळे माझी ही अवस्था झाली असंही त्याला ऐकवलं. त्यावर, ‘तुझी तब्ब्येत तू नीट ठेवत नाहीस त्याला मी काय करावे? तुला काहीच नीट जमत नाही. मी म्हणून सांभाळून घेतो. तुझी दीडदमडीची नोकरी काय चाटायची! तू नसलीस तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. तुला स्पष्टीकरण द्यायला मी बांधील नाही. मी कुठेही जायला स्वतंत्र आहे.’ असे अनेक वाग्बाण त्याने देखील माझ्यावर सोडले. मी या माणसाबरोबर इतकी वर्षे कशी घालवल,  का घालवली असे अनेक प्रश्न मला छळू लागले. मग माझं कुठेच लक्ष लागेना. कामात चुका होऊ लागल्या. तिथं देखील बोलणी खावी लागली.  मला ऑफिस मधल्या सहकारी सोडून इतर फारशा मैत्रिणी नाहीत. पण त्या सुद्धा, त्यांच्या वाढलेल्या संसारात गुंतल्यान, माझ्याकडे पहायला त्यांना  वेळ नव्हता. मी एकटी पडले.कुणी बोलायला नाही की ऐकून घ्यायला. आयुष्य कंटाळवाणे झाले. मुलेही अर्धवट वयाची त्यांना माझी कुचंबणा काय समजणार! माझ्या मनाचा कोंडमारा होऊ लागला. माझी तब्येत बिघडू लागली. उद्यनं माझी काळजीनं कधीच चौकशी केली नाही. तो, त्याची मित्रमंडळी, ऑफिसच्या गमतीजमती यात रमून गेला. मुले सैरभैर झाली. मला काहीच सुचेना. माझा माझ्यावरचा ताबा नष्ट झाला. यातून सुटण्याचा मार्ग म्हणून मी आत्महत्या करायच ठरवलं. तुला मी दिसले म्हणून तू मला वाचवलं.” 

      माझ्या ऑफिसमध्ये माझ्याबरोबर काम करणारी माझी सहकारी विद्या नातू हिची ही कहाणी. तिनं नदीत उडी मारली तेव्हा मी तिथं जवळच होतो. आरडाओरडा ऐकून मी पाण्यात उतरून तिला वाचवलं. पण आता पुढे काय करायचं हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.